˙˙जय मुक्ताई ..

Friday, 28 October 2016

शुभेच्छा दिपावळीच्या

शुभेच्छा दिपावळीच्या
●●●●●●●●●●●●●●●
     किती हास्यास्पद बाब आहे ना, ही दिपावळीच्या शुभेच्छांची..!
आपण सहज शुभेच्छा द्यायच्या म्हणुन आपल्या हितचिंतकांना देत असतो,पण कधी यावर विचार केलाय तरी का की खरच आपली पात्रता तरी आहे का अशा दिपावळीच्या शुभेच्छा देण्याची..?
अहो केवळ प्रथा म्हणूनच शुभेच्छा देण्याची आपली परंपरा मुळीच नाहि तर देण्यासाठी ती वस्तु आपल्याजवळ उपलब्ध असायला हवी ना..!
      म्हणजेच आधी स्वतः त्या शुभ ईच्छांची भांडारे सर्वप्रथम आम्ही ओतप्रोत आत्मसात करायला हवी तद्वतच् अनुभवायला सुध्दा हवी आणि मगच त्यातुन खुशाल वाटायला हवी...
तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण
पण...
     आम्हाला फक्त बाजार भरवायची सवय जडलेली असल्यामुळे, शुभेच्छांचाही व्यवहार करण्याआधी आम्ही क्षणभरही सारासार विचार करीत नाही...
   आमच्या नयनांनी मनात साठवलेला कित्येक जन्मांतरीचा वासनेचा घनघोर काळोख मिटवण्यास, आम्ही स्वतः समर्थ नसतांना दुसर्‍यांचा मार्ग ज्ञानसंपदेने प्रकाशीत करणार्‍या बाष्फळ शुभेच्छारुपी तत्वज्ञानाच्या गोष्टींचा दुसर्‍यांवर कितीही वर्षाव केला तर अशा अव्यवहार्य शुभेच्छांमधुन काय साध्य होईल..?
आमच्या मनात कामक्रोधरुपी षडरिपुंच्या अंधःकाराने थैमान माजवलेले असतांना आमच्या शुभेच्छांनी दुसर्‍यांच्या मनात सात्विक उजेडाचा दिप कसा पेटवल्या जाईल..?
आमच्या विचारांना अविवेकाच्या काजळीचे ग्रहण लागलेले असतांना आमच्या अवाजवी शुभेच्छांनी इतरांच्या बुध्दीमधे सद-सदविवेकाचे तेज कसे व कोठुन प्रकाशित करता येईल, सांगा ना..!
अहो...
    आमच्या या देहाला जर स्मशानात जळुन कोळसा व्हायचे नक्की असेल तर केवळ आमच्या देहिक शुभेच्छांनी इतरांना क्षणभंगूर ज्योतीमय सुखाचा मृगजळाभासीत प्रकाशही का दाखवावा..?
म्हणुन
     माऊलींनो कुणालाही दिपावळीच्या शुभेच्छा देण्यापुर्वी आपल्या मधील सार्वभौम अज्ञानमयी अंधःकार समुळ नाहीसा करण्याचा प्रयत्नाला लागणे कधीही क्रमप्राप्त होईल.
    आमच्या संतमालिकेतील प्रत्येक संतांनी स्वःचा अंधःकार नाहीसा केल्यानंतर जनसामान्यांच्या उध्दार करणारा ज्ञानदिप तेववण्यासाठीच्या शुभ ईच्छा सर्वांसाठी आयुष्यभर व्यक्त केलेल्या आहेतच आणि त्याच शाश्वतही आहेत.
म्हणून...
केवळ कोरड्या शुभेच्छांचा दिप प्रज्वलित करण्याऐवजी,
प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदिपः अशा व्यापक ज्ञानदृष्टीने परिपुर्ण असलेला व्यासमयी शुभेच्छांचा दिपक या दिपावळीत पेटवूया,कदाचित अशीच दिपावळी संतांनाही तर अपेक्षीत नाही ना..!

...जयमुक्ताई...रामकृष्णहरी...👣स्पर्श...

No comments:

Post a Comment