˙˙जय मुक्ताई ..

Wednesday, 5 October 2016

शारदीय नवरात्र

शारदीय नवरात्र
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
   भगवती जगदंबेच्या नऊ रूपांचे वर्णन पुराणांनी केलेले आहे. यांनाच नवदुर्गा म्हणतात. नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये त्यांची रोज एक याप्रमाणे उपासना केली जाते. या नऊ दुर्गा पुढीलप्रमाणे - 
१. भगवती शैलपुत्री 
दक्षकन्या सतीने योगमार्गाने देहत्याग केल्यानंतर ती हिमालय व मेनका या दांपत्याच्या पोटी " पार्वती " नावाने जन्माला आली. हिमालयाची कन्या म्हणून तिला " शैलपुत्री " म्हणतात.
२. भगवती ब्रह्मचारिणी 
हिमालयसुता पार्वतीने शिवशंकर पती म्हणून प्राप्त व्हावेत, यासाठी घोर तपश्चर्या केली होती, म्हणून तिला " ब्रह्मचारिणी " नावाने ओळखतात.
३. भगवती चंद्रघंटा 
चंद्रघंटा म्हणजे आल्हाद देणारी, भक्तांना सर्व प्रकारचे सुख प्रदान करणारी. हिच्या एका हातात अमृतकुंभ असतो, तो तिच्या कृपेने लाभणा-या सुखाचे, आनंदाचे प्रतीक आहे. 
४. भगवती कुष्मांडा 
कुष्मांड म्हणजे कोहळा. या कोहळ्याचा बळी देतात देवीच्या यज्ञांमध्ये. हा कोहळा जिला आवडतो ती कुष्मांडा. दुसरा तात्त्विक अर्थ असा की, कुष्मांड म्हणजे एक प्रकारचे पिशाच असते व ते आभासी असते, thought form सारखे असते. माया ही अशीच भ्रामक व आभासी असते व ही जगदंबाच भगवंतांची मायाशक्ती असल्याने तिला " कुष्मांडा " म्हणतात.
५. भगवती स्कंदमाता
स्कंद म्हणजे कार्तिकेय, त्यांची आई ती स्कंदमाता. ही पूर्ण प्रेमळ देवता आहे. शास्त्रामध्ये वर्णिलेले तिचे रूपही छान आहे. तिच्या हातात दोन कमळे व एक हात वरमुद्रेत असतो. एका हाताने तिने कार्तिकेयाला धरलेले असते. जगदंबेचे हे परम प्रेमळ मातृस्वरूप असल्याने तिच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. कार्तिकेयांना सहा मुखे असतात, तसेच आपण सर्व जीव ; काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या सहा विकारांद्वारे व्यक्त होत असतो. अशा आपल्यासारख्या पापी, विकारी जीवांचाही सर्व बाजूंनी सांभाळ करणारी ती स्कंदमाता होय.
६. भगवती कात्यायनी 
कत नावाच्या ऋषींचे पुत्र कात्य, त्यांच्याच वंशात पुढे थोर ज्ञानी असे कात्यायन ऋषी झाले. त्यांनी जगदंबेची कठोर तपश्चर्या करून तिला आपली मुलगी हो, म्हणून वर मागितला. तीच ही कात्यायनी. गोपींनी श्रीकृष्ण हे पती म्हणून लाभावेत यासाठी व्रजवनातील कात्यायनीचे व्रत केले होते. श्रीसंत गुलाबराव महाराज हे महिनाभर चालणारे व्रत मोठ्या प्रेमाने करीत असत.
७. भगवती कालरात्री 
काल म्हणजे मृत्यू, त्याची स्वामिनी ती कालरात्री. ही शिवशंकरांची संहारक शक्ती आहे. ही भक्तांचे सर्व प्रकारच्या भयांपासून संरक्षण करते.
८. भगवती महागौरी 
अत्यंत गौरवर्णाची ती महागौरी. हीच भगवती पार्वती होय. गौर वर्ण हा शुद्धतेचे, पावित्र्याचे द्योतक आहे. 
९. भगवती सिद्धिदात्री 
सिद्धी प्रदान करणारी किंवा भक्तांना उपासनेचे योग्य फळ देणारी ती सिद्धिदात्री होय. 
या नऊ दुर्गांचे जो रोज स्मरण करतो, तो सर्व संकटांपासून सहज मुक्त होतो, असे मार्कंडेय पुराणात म्हटले आहे. 
यांशिवाय तंत्रशास्त्रांमध्ये जगदंबेच्या आणखी दहा रूपांची उपासना केली जाते. यांना " दश महाविद्या " असे म्हणतात. या महाविद्या अत्यंत प्रभावी असून भोग-मोक्षदायक आहेत. पण यांची उपासना अतिशय कठीण व कष्टदायक आहे. या सर्व महाविद्यांची पूर्वीच्या काळात आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर उपासना प्रचलित होती. यांची अनेक स्थाने देखील वैभवसंपन्न होती. या महाविद्यांची उपासना अत्यंत गुप्त राखलेली आहे. आज क्वचितच यांची शास्त्रशुद्ध उपासना अगदीच मोजक्या स्थानी होताना दिसते. 
देवी भागवतामध्ये जगदंबेच्या अंश, अंशांश, कला आणि कलांश अशा अनेक रूपांचेही वर्णन केलेले पाहायला मिळते. त्यांमध्ये यच्चयावत सर्व स्त्रिया या जगदंबेच्या कलांशच असल्याने त्यांचा नेहमीच आदर करावा, सन्मानाने वागवावे, अन्यथा जगदंबेच्या रोषाला कारणीभूत व्हावे लागेल असे स्पष्ट म्हटलेले आहे.
भगवती जगदंबा हीच सर्व चराचर सृष्टीच्या रूपाने नटलेली आहे. त्यामुळे आपल्याला दिसणारे, भासणारे, जाणवणारे व प्रत्ययाला येणारे यच्चयावत सर्व विश्व हे तिचेच रूप आहे, त्यामुळे तिच्या अवतारांची संख्या करणे केवळ अशक्यच आहे.
भगवती जगदंबेची वैकुंठनिवासिनीच्या रूपामध्ये पूजा व तिच्यासमोर मांडलेला वैष्णव गोंधळ संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी फार बहारीच्या शब्दांमध्ये मांडलेला आहे. आज नवरात्राच्या नवव्या माळेला आपण त्याच गोंधळाद्वारे आदिमाया नारायणी जगदंबा मातेच्या श्रीचरणीं सादर वंदन करून तिच्याकडे ज्ञान, भक्ती व प्रेमाचा जोगवा मागूया आणि भगवती अंबामातेच्या नामस्मरणात दंग होऊया !!

सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो । 
पंच प्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिल्लाळ वो ।।१।। 
पंढरपुरनिवासे तुझे रंगीं नाचत असे वो ।
नवस पुरवी माझा मनींची जाणोनिया इच्छा वो ।।२।।
मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारीं वो ।
चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ।।३।।
बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे वो ।
उद्गारे गर्जती कंठीं तुळसीची भूषणे वो ।।४।।
स्वानंदाचे ताटी धूप दीप पंचारती वो ।
ओवाळिली माता विठाबाई पंचभूती वो ।।५।।
तुझे तुज पावले माझा नवस पुरवी आतां वो ।
तुका म्हणे राखे आपुलिया शरणागता वो ।।६।।
व्हॉट्सप सौजन्य
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

No comments:

Post a Comment