˙˙जय मुक्ताई ..

Wednesday, 5 October 2016

अवतार गोकुळी हो

अवतार गोकुळी हो
●●●●●●●●●●●●●●
   व्दापारयुगात भगवंताने अवतरीत व्हावे आणि लगेचच वसुदेवजींना विनंती करावी -
नंदाच्या घराला। मज नेई गोकुळाला॥
जन्म घेतल्या-घेतल्या मथुरेतुन लगेच बाहेर जाण्यामागे काय दडल असेल, याचेच अल्पमतीने चिंतन करण्याचा आज आपण प्रयत्न करुया...
कंसमामाला मारण्याचे सामर्थ्य भगवंतामधे होतेच यात कुणाचेही दुमत नसेलच, तरिही भगवंताने मथुरानगरी सोडली ती काय कंसमामाच्या भितीने का..?
मुळीच नाही..!
तर केवळ गोकुळाच्या जनांना तारुन त्यांच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठीच...
अवतार गोकुळी हो जन तारावयाशी...
अर्थात,
गोकुळात असलेल्या प्रत्येक जीवाला भगवंतांनी मागील जन्मात काही ना काही वचन दिलेले होतेच,अर्थात
रघुकुल रित सदा चली आयी।
प्राण जाए पर बचन न जायी॥
या प्रभुवचनाप्रमाणे प्रभुनेच मागील अवतारात दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी श्री'कृष्ण अवतारात आल्या-आल्या लगेच मथुरेतुन गोकुळाला रवाना झालेत. हेच त्रिकालाबाधीत सत्य समजावे, कारण त्याने बालपणीच कित्येक आक्राळविक्राळ दैत्य तथा राक्षस गणांना सहज पराभुत केल्याच्या कथा आपण ऐकलेल्याच असतील. जेणेपरत्वे मग कंसमामाच्या भितीने पलायन करणार्‍यांपैकी हे महाशय मुळीच नव्हते.
तर...
वचन न मोडी बोलीले ते।
मागील अवतारात दिलेल्या वचनांची पुर्ती करण्यासाठीच हा भगवंत गोकुळात येता झाला.
ऋण फेडावया अवतार केला।अविनाशी आला आकाराशी॥
आता दिलेले वचन राखण्यासाठीच हा अविनाशी भगवंत गोकुळात आकाराला आला.
मग याचेवर कुणाकुणाचे ऋण होते याबाबत सांगायचे म्हटले तर तसे गोकुळात नांदत असलेल्या प्रत्येकाचे काही ना काही वचनरुपी ऋण भगवंतावर शिल्लक होतेच म्हणुनच काहींच्या केवळ सहवासात राहुन भगवंताने त्यांना आनंदाची प्राप्ती करुन दिली, तर काहींसोबत प्रत्यक्ष रुप,लिला व गुणमाधुर्याने रासलीला करुन आपल्याच आनंदकंद या मुळ स्वभावाच्या ठिकाणी स्थितप्रज्ञ केले होते त्यामधे प्रामुख्याने नंदबाबा, यशोदामाता, देवाचे सवंगडी असलेले बालगोपाल आणि सखीं 'गोपिका अर्थात गवळणी'
इथे मात्र भगवंतानी या सर्वांपैंकी गवळणींना विशेष आनंदामधे कायम अनुभुत केलेले होते, जरी वरकरणी प्रत्यक्षपणे गवळणींना काहीच प्रदान केलेले दिसत नसले तरी सर्व गवळणींना स्वःस्वरुपाच्या दिव्य अमृतानंदाचे धनी केलेले होते. या गवळणींना एवढे सुख भगवंताने दिले की त्या सुखाला कधीच अंत नव्हता.
गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा।
अशा या १२ प्रकारच्या "गवळणींच्या विशेष सहवासासाठीच" अनंत ब्रह्मांडाचा धनी असलेला भगवंत, नंदबाबा घरी संपुर्ण गोकुळालाच शुध्द व शाश्वत सुखचा आनंद प्रदान करण्यासाठी बालक म्हणुन रांगु लागले.
अनंत ब्रह्माडे उदरी।हरि हा बालक नंदाघरी॥
वर उल्लेख केलेल्या १२ प्रकारच्या स्त्रिया ज्या व्दापारयुगी गोकुळात जन्मल्या होत्या, त्या सर्व भगवंताच्या मागील जन्मीच्या वचनपुर्तीच्या क्षृधापेक्षेने गवळणी म्हणुन गोकुळात भगवद-कृपादृष्टीची आस लावून जगत होत्या. त्यातील बर्‍याच ह्या राम अवतारातील स्त्रिया होत्या आणि तेव्हा प्रत्येकीला वेगवेगळी वचने प्रभुंनी त्याकाळी दिलेली होती ज्याची पुर्तता भगवंतांनी या गोकुळीच्या आठव्या अवतारात येवुन केलेली आहे त्या १२ गवळणींचे वर्णन खालीलप्रमाणे-
१)श्रृतीस्वरुपा गोपी २)मिथीलावासी गोपी ३)कोसलवासी गोपी ४)अयोध्यावासी गोपी ५)ऋषीरुपा गोपी ६)पंचवटीवासी भिल्लगोपी ७)यज्ञसितास्वरुपी गोपी ८)रमादेवी/लक्ष्मीसख्या गोपी ९)देवाज्ञापित गोपी १०)देवांङनारुपी गोपी ११)जालंदर नगरवासी गोपी १२)बहिंष्मती नगरवासी गोपी
ह्या बारा प्रकारच्या रामावतारातील गोपस्त्रियांना व्दापारयुगात भगवंतानी आपल्या स्वरुपात मोहीत करुन देहभावाने ठकवले होते आणि पुन्हा यांना पाच जातींमधे विभागुन भगवंतांने प्रत्येकीला अपेक्षीत भावातीत आनंदकंद रुपाने मोहीनी घातली होती, ते पाच प्रकार येणेप्रमाणे-
मराठी कानडी कोकणी गुजराणी आणि मुसलमानी
या प्रत्येकीला पुर्वी दिलेले वचन कृष्णावतारात तंतोतंत पाळत, सर्वांना आपल्या मुळ परमानंद स्वरुपाचा अनुभव देत भगवंतानी आपली ओळख करुन दिली होती,त्यात कुठलाच भेदभाव भगवंतानी ठेवला नव्हता, सर्वांना एकच माप ते म्हणजे आनंदघनाची प्राप्तीसह दिव्यसुखाची तृप्ती.

मग ह्या सर्वांच्या सहवासात भगवंतांनी आपले विश्वव्यापक स्वरुप विसरुन बालपण व्यतीत केले, ह्या प्रत्येकीच्या कडेवर भगवंतांनी कितीतरी वेळा बसावे आणि ह्यांच्या प्रेमात स्वतःलाही विसरुन जावे.
विश्वव्यापक कमळापति।त्यासी गौळणी कडिये घेती॥
या गवळणींच्या प्रेम व सहवासापुढे भगवंताला विश्वव्यापकतेचे सुख सुध्दा कमी वाटत होते म्हणुन याने त्यांच्या कडेलाच आपले बालसिंहासन समजावे व स्वतःही अनन्यभुत आनंद घ्यावा, कारण हे सुख त्याला इतरत्र मिळतच नसावे म्हणुन तो ही गवळणींच्या मोहसुखाला आसुसलेला होता.
काही तर म्हणायचेच की हा नेमका यशोदेचाच की या गवळणींचा, हेच न सुटलेले कोडं होतं. भगवंत आणि गवळणींचे एकमेकांशी एवढे प्रेमसंबंध होते की भगवंत गवळणींचा की गवळणी भगवंताच्या हे सांगणेही त्याकाळी अवघड होते एवढी अभिन्नता.
असा हा भगवंत दिवसा या गवळणींच्या अंगणी नांदे आणि रात्री त्यांच्याच घरच्या दह्या-दुधाची,तुप-लोण्याची चोरीही करु लागला. 

रांगत रंगणी चोरीत लोणी
ह्या गोपिकांच्या नानाविध प्रकारच्या खोड्या भगवंताने काढाव्या आणि गोपिकांनीही भगवंतांला त्या खोड्या करण्यास प्रवृत्त करावे, विरोध ही करायचा पण तो फक्त केवळ नाममात्रच..! कारण विरोध करुन का होईना तेवढाच जास्तवेळ भगवंत त्यांच्या नजरेसमोर रहायचा आणि त्याच्या मनमोहक रुपात गवळणीं स्वतःचे देहपण विसरुन स्वतःला सामावुन घ्यायच्या, एवढे भगवंत सुंदर दिसायचे या रुपाचे वर्णन करतांना तुकोबाराय सुध्दा आवर्जुन सांगतात की-
कस्तुरी मळवट चंदनाची उटी।रुळे माळ कंठी वैजयंती।
राजस सुकुमार मदनाचा पुतळा।
असा हा मनमोहन जणु मदनाचा पुतळाच या गवळणींना भासत होता.
अशाप्रकारे नानाविध प्रकारच्या खोड्या करतच भगवंताचे दिव्य बालपण व्यतीत झाले. यापुढील तारुण्यावस्थेत मात्र आपल्या सावळ्या रुपाने आणि गुणमाधुर्यानेच केवळ गवळणींनाच नव्हे तर संपुर्ण गोकुळालाच वेड लावले होते.
रुपे सुंदर सावळा गे माये
वेणु वाजवी वृंदावना...
गोधने चारिता गे...
सावळा गे माये...रुपे सुंदर...
भगवंताच्या गुणमाधुर्यात वेणू अर्थात बासरीच्या मधुर सुरांची भर पडली होती.भगवंताच्या या वेणुमाधुर्याचे वर्णन करतांना गवळणींची होणारी अवस्था हि फारच विलक्षण तसेच अवघड सुध्दा होत होती.
अहो,
गवळणी तर बासुरीच्या सुरांमधेच जणू अक्षरशः वेड्या झाल्या होत्या, यांच्या काणी मधुर सुरांची बरसात होताच यांनी आपला सर्व कामधंदा बाजुला टाकावा आणि स्वतःला इच्छा नसतांनाही त्या सुरांच्या हवाली सुपूर्द करावे अशी संमोहीतावस्था गोपींची होत असे -
आ हा रे सावरीया कैसी वाजवली मुरली। मुरली नव्हे केवळ बाण जीने हरिला माझा प्राण। संसार केला दाणादाण मी घर-धंदा विसरली।
गवळणींच्या या वेणूवेडाच्या नादाने त्यांना घरच्या तसेच बाहेरच्यांच्या नाना लांच्छणाला सामोरे जावे लागायचे तरिही त्या गोपीं भगवंताची सुमधूर बासरी कानी पडताच, समाजाच्या लाच्छणांची मुळीच तमा न बाळगता मुरलींमनोहराच्या वेणूमाधुर्याकडे स्वतःला अगदी उताविळपणे स्वाधिन करायच्या
उताविळ झाल्या गवळणी। वेणुनाद पडियेला कानी।भोवती पाहती आवलो कोणी। नयनी न दिसे शारंगपाणी वो पाणी वो पाणी॥
अशा प्रकारे पावा वाजणार्‍या त्या शारंगपाणी भगवंताला वेणूच्या सुरांमधूनच शोधीत त्या सुखानंद उपभोगीत होत्या.
शेवटी,आपले सर्वस्वच त्या गोपीकांनी श्री'कृष्णचरणी समर्पित करीत कृष्णाठायी आनंदमय म्हणुन सुखे पावल्या. तसेच ज्याप्रमाणे जशी ज्यांची योग्यता असेल तशीच भगवंतांनी सर्वांना सुखानंदाची प्राप्तीही करवून दिली आणि त्या सुखानंदाचे अविभाज्य अंग बनूनच आजही गोपीका आपल्या हृदयात केवळ स्मरणरुपाने छंदे-छंदे नाचतच तर आहेत ना..! आनंदल्या गौळणी छंदे-छंदे ड़ोलती।
असे हे गोकुळीचे दिव्य सुखाचे अनुभव पाहुनच तुकोबारायांनाही तर कृष्णाच्या आरतीत म्हणावेसे वाटले नसेल ना..?
अवतार गोकुळी हो,जन तारावयासी।लावण्यरुपडे हो, तेजपुंजाळ राशी।उगवले कोटिबिंब, रवि लोपला शशी।
उत्साह सुरवरां, महाथोर मानसी।जय देवा कृष्णनाथा।
...जयमुक्ताई...रामकृष्णहरी...स्पर्श...

No comments:

Post a Comment