˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

नवल

नवल
●●●●●
भगवंताचा प्रत्येक अवतार हा अपुर्व नवलाईने परिपुर्ण आहे,
पण तुकोबारायांच्या लेखी सर्वोत्तम असलेल्या भगवंताच्या नवलाईचे कोडे आपल्यालाही उमगले तर हे सुध्दा एकप्रकारचे नवलच होणार नाही का..!
या नवलाईचे-नवल तुकोबारायांना अनुभवांती कळाले म्हणुनच तीचे वर्णन करतांना महाराज म्हणतात की-
अनंत ब्रह्मांडें उदरीं।हरि हा बाळक नंदाघरीं॥
त्या परमात्म्याने आपल्या उदरीे अनंत ब्रह्मांडे सामावलेली असतील तर त्यात तीळभरही नवल नाही मात्र अनंत ब्रह्मांडे उदरी सामावलेला तोच परमात्मा नंदबाबा घरी बालक म्हणुन रांगु लागला हिच मोठी नवलाई नाही का..!
पृथ्वी जेणें तृप्त केली।त्यासी यशोदा भोजन घाली॥
सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या क्षृधा-शांतीची व्यवस्था त्या भगवंताने कलेेली आहे यात नवल ते काही नाही पण संपुर्ण पृथ्वीचे भरणपोषण करणार्‍या त्या परमात्म्याची भुक मात्र आई यशोदेने शमवली यात दडलेले खरे नवल आपल्याला समजले नाही का..!
विश्वव्यापक कमळापति।त्यासीं,गौळणी कडिये घेती॥
विश्वव्यापक असलेल्या भगवंतात, नवल तसे काहीच नाही पण त्याच विश्वव्यापक कमळापति भगवंताला मात्र तुम्हा आपल्यासारख्याच गवळणींने कडेवर घ्यावे यात किती मोठे नवल आहे ना..!
तुका म्हणे नटधारी।भोग भोगुन ब्रह्मचारी॥
तुकाराम महाराज म्हणतात की याने आपल्यासारखेे कित्येक सर्वसामान्य नटांचे आयुष्य भोगीले,यात मात्र मुळीच नवलविशेष नाही पण असे सर्व भोग भोगुन सुध्दा हा नटधारी ब्रह्मचारीच राहीला,हीच तर नवलाई होत नाही का..!
म्हणुन महाराजांना सर्व अवतारांमधुन या आठव्या भगवान श्री'कृष्णांच्या चरित्राचे विशेष नवल वाटले आणि हि नवलाई तुकोबारायांनी समजुन घेतल्यानंतर या कान्होबा विषयी त्यांना म्हणावे लागले की-
नवल केवढे केवढे।न कळती कान्होबाचे कोडे॥
अशा या नंदनंदनाचे आठव्या अवतार कार्यातील लीलांचे कोडे आपल्याला ही कळाले तर तुकोबारायांसारखे आपणालाही त्याचे नवल अनुभवता येईलच..!
...जयमुक्ताई...रामकृष्णहरी...👣स्पर्श...

No comments:

Post a Comment