˙˙जय मुक्ताई ..

Friday, 30 September 2016

द्वारकेचा राणा पाड़ंवाघरी

द्वारकेचा राणा पाड़ंवाघरी

    भक्त म्हटल की निर्भयता व निश्चळ विश्वास असावा लागतो. भक्ताच्या ठिकाणी फक्त श्रद्धा महत्त्वाची नसते तर विश्वास हा त्याहून अतिमहत्वाचा असतो. श्रध्देचा जन्म होतो म्हणून श्रद्धा कालांतराने कमीअधिक होऊ शकते. परंतू, विश्वास हा अजन्मा असतो.
     हस्तिनापुरात एकदा धर्मराजाकड़े अचानकच एका सणाच्या निमित्ताने उत्सवाचे नियोजन करण्यात आले. या उत्सवासाठी भगवान श्रीकृष्ण उपस्थित असावे असी धर्मराजाची इच्छा होती. परंतु, उत्सवदिनाला अवधी इतका कमी उरला होता की द्वारकेला कोणी जाऊन परत येण्याइतपत दिवसही शिल्लक उरले नव्हते. आता या प्रसंगी धर्मराज चिंतातुर झाले. भीमदादा धर्मराजाला म्हणाले "दादा, उद्याच्या उत्सवासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्माला आणायची जबाबदारी माझी
आपन निश्चींत असावे व उत्सवाची उर्वरीत तयारी करावी" सर्व जण मिळून उत्सवाची तयारी करू लागले. अखेर उत्सवाचा दिवस उजाडला
सर्व जणांची धावपळ सुरु होती. तयारी जवळजवळ पुर्ण होत आली. तितक्यात धर्मराजाला भगवंताची आठवण झाली. मग भिमदादाची शोधाशोध सुरू झाली. बरेच प्रयत्नानंतर अखेर भिमदादाचा शोध पुर्ण झाला
भिमदादा एका निवांत ठिकाणी आपली गदा घासत बसले होते. धर्मराज तिथे येतात व भिमाला विचारतात "तु भगवंताकड़े निरोप घेऊन कुणाला पाठवले आहेस का?" तेंव्हा भिमदादा म्हणतो "दादा , काळजी नसावी, आपन ते काम माझ्यावर सोपवले आहे ना?,आपन तयारी करावी."
    धर्मराजा महालात आले सर्व पंगती बसल्या, भिमदादा म्हणतात, "पात्र प्रौक्षण करा". द्रौपदीने सर्वांना पात्र वाढून झाले तरी भगवान आले नाही. धर्मराज पुन्हा भिमाला म्हणतात, "अरे भिमा काय हे?" भिमदादा बाहेर येतात व आपली अत्यंत वजनदार गदा वरती आकाशात आपल्या सर्व ताकदीनिशी फेकतात. व भगवान द्वारकाधिशाला पुकारतात. "देवा! तुझ्या या भक्ताच्या जीवाचे रक्षण करावयाचे असल्यास प्रगट व्हा
नाहीतर या गदेखालीच मरतो....!!" आपल्या
भक्तांच्या अधिन असलेल्या भक्तवत्सल श्रीकृष्ण परमात्माने भिमाची गदा वरतून खाली पड़ण्यापुर्विच आकाशातच धरली. गदा हातात घेऊनच भगवान श्रीकृष्ण भिमाच्या समोर आकाशातून खाली आले. व भिमाला विचारू लागले. "अरे भिमा हा काय आततायीपणा !, इतक्या तातडीने मला कशासाठी बोलाविलेस?" भिमदादा देवाला म्हणतात, "देवा, वेळच नव्हता, मग काय करू? चला जेवायला...."
    केवढा हा आत्मविश्वास आणि ह्या आत्मविश्वासाबरोबर ही तयारी होती की गदेने समाप्त झाले तरी चालेल, कारण पाड़ंव हे भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. भक्तीमार्गात विश्वास असावा तो भिमाइतका... व मला वैयक्तिक तरी वाटते फक्त भिमानेच म्हणावे,
"नको ब्रम्हंज्ञान"
 व पाड़ंवा व संतानीच म्हणावे
"तुझे पायी मज झालासे विश्वास"
या भगवद् विश्वासापायीच ,
द्वारकेचा राणा पाड़ंवाघरी.

जय मुक्ताई

https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment