˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 27 August 2017

*🌺|| श्री विठ्ठल ||🌺*

*न करीं सायासाचें काम.......*

      माऊली ज्ञानोबारायांनी नामस्मरणाचे महत्त्व वारंवार सांगितले, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ईश्‍वरप्राप्तीचा हा सर्वात सोपा आणि शरीराला कुठल्याही पातळीवर कष्ट न देणारा असा सर्वोत्तम भक्तीमार्ग आहे. शास्त्रग्रंथांचे वाचन जरी आयुष्यात झाले नाही, तपश्‍चर्या करणे तर केवळ अशक्यच हे ठाऊक झाल्यामुळे त्या वाटेकडे नजरसुद्धा फिरवली नाही, उपास वा व्रते करणे किंवा तीर्थक्षेत्रांना भेटी देणेसुद्धा जमले नाही तरी जीवाला वाईट वाटायला नको. केवळ अखंडपणे नाम घेतले तरी ईश्‍वराची प्राप्ती होईल असा आशीर्वाद माऊली ज्ञानोबारायांनी सर्व आर्त भक्तांना अनेक वेळेला दिला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात,
*जप तप अनुष्ठान |*
*नित्य आमुचें रामधन |*
*रामकृष्ण नारायण |*
*हाचि जिव्हार सर्वदा ||*

   श्रीरामाच्या वा श्रीविठ्ठलाच्या अत्यंत मधुर नामाचा अष्टौप्रहर उच्चार करणे, ह्या पवित्र नामाचे सतत स्मरण करणे हाच आमचा जप आहे, हीच आमची तपश्‍चर्या आहे. ह्या रामनामासाठी आम्हाला रानावनात जाऊन तपश्‍चर्या करण्याचे अत्यंत कठोर असे व्रत करावे लागत नाही. नामस्मरण हेच आमचे अनुष्ठान. तिच आमच्या आयुष्याची संगती आहे. तेच तर आमचे जीवन आहे. तोच आमचा शाश्‍वत आनंद आहे.
*जयासी अमृत घट |*
*रामकृष्ण घडघडाट |*
*हेचि पूर्वजाची वाट |*
*सर्व जीवाशी तारक ||*
     माऊली ज्ञानोबाराय ह्या नामस्मरणासंबंधी एक विलक्षण असा विचार देतात की, ज्याच्यापाशी हे रामनामाचे अमृताहून गोड असणारे घट आहेत आणि ह्या घटांमधले हे अमृत जे सतत प्राशन करतात त्यांना सहजपणे अमरत्व प्राप्त होते. ज्यांच्या मुखात फक्त परमेश्‍वरी नामाचा आणि विचारांचा गडगडाट आहे ते जीव हा भवसागर निश्‍चितपणे तरून जातील. आपले भाग्यवान पूर्वज ह्याच हरिनामाच्या वाटेवरून मोक्षाच्या दिशेने चालत गेले. म्हणूनच तर माऊली ज्ञानोबाराय आवर्जून सांगतात की, रामकृष्णहरि हा जप सर्व जीवांचा तारक मंत्र आहे.
*गोविंद गोविंद राम |*
*सर्व साधिलें सुगम |*
*न लगे तीं तपें उत्तम |*
*रामकृष्ण पुरे आम्हा ||*
    हा भवसागर तरून जाण्यासाठी केवळ नामस्मरणातच दंग व्हा. सतत परमेश्‍वराच्या नामाचा उच्चार करा. रामकृष्णगोविंद हा नामजप पुरेसा आहे. त्यासाठी तपश्‍चर्या नको की कुठल्याही प्रकारचा यज्ञ करायला नको. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आम्हाला तर केवळ रामकृष्ण नामाचा जयजयकार पुरेसा आहे. केवळ नामोच्चार पुरेसा आहे.
*ज्ञानदेवी स्नान ध्यान |*
*राम राम नारायण |*
*इतुकेंचि पुरे अनुष्ठान |*
*हेचिं जीवन शिवाचें ||*
    माऊली ज्ञानोबाराय सर्व परमभक्तांना अत्यंत प्रेमाने सांगतात की, आम्हाला तर केवळ नामस्मरणाचे अखंड स्नान पुरेसे आहे. नामाच्या पावसात आम्ही चिंब भिजतो. एवढे अनुष्ठान तर आम्हाला खूप झाले. म्हणुनच  संत चोखोबाराय म्हणतात,
*न करीं सायासाचें काम |*
*गाईन नाम आवडीं ||*

संग्रहीत

*जय जय मुक्ताईं*
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment