˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 27 August 2017

*🌺|| श्री विठ्ठल ||🌺*

*न करीं सायासाचें काम.......*

      माऊली ज्ञानोबारायांनी नामस्मरणाचे महत्त्व वारंवार सांगितले, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ईश्‍वरप्राप्तीचा हा सर्वात सोपा आणि शरीराला कुठल्याही पातळीवर कष्ट न देणारा असा सर्वोत्तम भक्तीमार्ग आहे. शास्त्रग्रंथांचे वाचन जरी आयुष्यात झाले नाही, तपश्‍चर्या करणे तर केवळ अशक्यच हे ठाऊक झाल्यामुळे त्या वाटेकडे नजरसुद्धा फिरवली नाही, उपास वा व्रते करणे किंवा तीर्थक्षेत्रांना भेटी देणेसुद्धा जमले नाही तरी जीवाला वाईट वाटायला नको. केवळ अखंडपणे नाम घेतले तरी ईश्‍वराची प्राप्ती होईल असा आशीर्वाद माऊली ज्ञानोबारायांनी सर्व आर्त भक्तांना अनेक वेळेला दिला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात,
*जप तप अनुष्ठान |*
*नित्य आमुचें रामधन |*
*रामकृष्ण नारायण |*
*हाचि जिव्हार सर्वदा ||*

   श्रीरामाच्या वा श्रीविठ्ठलाच्या अत्यंत मधुर नामाचा अष्टौप्रहर उच्चार करणे, ह्या पवित्र नामाचे सतत स्मरण करणे हाच आमचा जप आहे, हीच आमची तपश्‍चर्या आहे. ह्या रामनामासाठी आम्हाला रानावनात जाऊन तपश्‍चर्या करण्याचे अत्यंत कठोर असे व्रत करावे लागत नाही. नामस्मरण हेच आमचे अनुष्ठान. तिच आमच्या आयुष्याची संगती आहे. तेच तर आमचे जीवन आहे. तोच आमचा शाश्‍वत आनंद आहे.
*जयासी अमृत घट |*
*रामकृष्ण घडघडाट |*
*हेचि पूर्वजाची वाट |*
*सर्व जीवाशी तारक ||*
     माऊली ज्ञानोबाराय ह्या नामस्मरणासंबंधी एक विलक्षण असा विचार देतात की, ज्याच्यापाशी हे रामनामाचे अमृताहून गोड असणारे घट आहेत आणि ह्या घटांमधले हे अमृत जे सतत प्राशन करतात त्यांना सहजपणे अमरत्व प्राप्त होते. ज्यांच्या मुखात फक्त परमेश्‍वरी नामाचा आणि विचारांचा गडगडाट आहे ते जीव हा भवसागर निश्‍चितपणे तरून जातील. आपले भाग्यवान पूर्वज ह्याच हरिनामाच्या वाटेवरून मोक्षाच्या दिशेने चालत गेले. म्हणूनच तर माऊली ज्ञानोबाराय आवर्जून सांगतात की, रामकृष्णहरि हा जप सर्व जीवांचा तारक मंत्र आहे.
*गोविंद गोविंद राम |*
*सर्व साधिलें सुगम |*
*न लगे तीं तपें उत्तम |*
*रामकृष्ण पुरे आम्हा ||*
    हा भवसागर तरून जाण्यासाठी केवळ नामस्मरणातच दंग व्हा. सतत परमेश्‍वराच्या नामाचा उच्चार करा. रामकृष्णगोविंद हा नामजप पुरेसा आहे. त्यासाठी तपश्‍चर्या नको की कुठल्याही प्रकारचा यज्ञ करायला नको. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आम्हाला तर केवळ रामकृष्ण नामाचा जयजयकार पुरेसा आहे. केवळ नामोच्चार पुरेसा आहे.
*ज्ञानदेवी स्नान ध्यान |*
*राम राम नारायण |*
*इतुकेंचि पुरे अनुष्ठान |*
*हेचिं जीवन शिवाचें ||*
    माऊली ज्ञानोबाराय सर्व परमभक्तांना अत्यंत प्रेमाने सांगतात की, आम्हाला तर केवळ नामस्मरणाचे अखंड स्नान पुरेसे आहे. नामाच्या पावसात आम्ही चिंब भिजतो. एवढे अनुष्ठान तर आम्हाला खूप झाले. म्हणुनच  संत चोखोबाराय म्हणतात,
*न करीं सायासाचें काम |*
*गाईन नाम आवडीं ||*

संग्रहीत

*जय जय मुक्ताईं*
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
#देवा_तूंचि_गणेशु

       सध्या गणपती उत्सव सुरू आहे. उत्साह, आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे. संत वाङमयात आणि इतरत्रही गणेशाची वर्णने वाचायला मिळतात. सगुण साकार गणेशाला ते ब्रह्म स्वरूप समजतात. गणपती अथर्वशीर्षात म्हटले आहे की, #त्वं_प्रत्यक्षं_ब्रह्मसि |
#सर्वं_जगदिदं_त्वयि_प्रत्येति |

    जग तुझ्यापासून निर्माण झाले. तुझ्या ‌ठिकाणी स्थिर आहे. जग तुझ्यातच लय पावते आणि जगाची प्रतीती तुझ्यात पहायला मिळते. हे विश्वव्यापक वर्णन पाहून अचंबा वाटतो ना?
    गणपतीचे रूप ॐकार स्वरूपाचे आहे असे वर्णन आढळते. ओंकारालाही ब्रह्म म्हटले आहे. एकाक्षरी मंत्र, वेदांमधले ज्ञान सारही म्हटले आहे. ॐ कारा संदर्भात लिहायचे म्हणजे स्वतंत्र लेख होईल. या संपूर्ण विश्वात, ब्रह्मांडात एक तत्त्व आहे, ज्याला चैतन्य, चेतना, ब्रह्मशक्ती, वैश्विक शक्ती वगैरे नावाने संबोधले जाते. म्हणजे एक मुलभूत शक्ती, जिने हे ग्रह तारे आणि ब्रह्मांडाचा पसारा उभा केला. त्या पसाऱ्यात पृथ्वी आणि आपणही आलोच. या मूळ शक्तीचीच रूपे म्हणजे ब्रह्मा, विष्णु, महेश आणि सरस्वती, काली ही होय. याच रूपांचे अनेक देव, देवता मानवाने संकल्पित केल्या आहेत. राम, कृष्ण, श्री दत्त वगैरे देव, देवता ही मूळ शक्तीचीच रूपे कारणपरत्वे निर्माण झाली. माणसात ती सगुण रूपात आपल्या जवळची आपले सख्य असणारी वाटली. परंतु श्रीराम काय किंवा महालक्ष्मी काय किंवा सप्तश्रृंगी देवी काय ही मूळ चैतन्याचीच रूपे आहेत. स्त्री तत्त्व आणि पुरूष तत्त्व ही दोन तत्त्वे संपूर्ण विश्वात आहेत आणि ती दोघेही एकमेकांत समाविष्ट आहेत. म्हणून रामाची उपासना केली, तरी ती अंतिमत: ती मूळ चैतन्य शक्तीची व त्या शक्तीच्या एकरूपतेची साधना आहे. त्यामुळे गणपतीतून त्या मूळ चैतन्य शक्तीचे रूप दिसत असल्याने तो ब्रह्ममय आहे. त्यामुळे शक्तीतून सारा पसारा झाल्यामुळे जग त्याच्यातच पहायला मिळते. म्हणून गणपती म्हणजे परब्रह्म असे विश्वव्यापक रूप संतांना दिसले.
   मग ज्ञानेश्वरांनी #हे_विश्वचि_माझे_घर ही भूमिका का मांडली,
#ॐ_नमोजी_आद्या |
#वेद_प्रतिपाद्या | किंवा
#देवा_तुचि_गणेशु |
#सकळमति_प्रकाशु |
   असे ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना का म्हटलेे ते समजते. 'हे ॐकारा गणेशा आदित्तत्त्व' म्हणजे मूळ तत्त्व असणाऱ्या आणि वेदांनाही प्रतिपादीत केलेल्या तुला वंदन असो, ही विश्वव्यापक भूमिका मांडली आहे.
   हे विश्वच महागणपतीचे रूप आहे असे तुकाराम महाराज देखील म्हणतात,
#रविशशी_तारांगणे_जयामाजी_सहजे | #उदरी_सामावली_जया_ब्रह्मांड_बीजे |
  सूर्य, चंद्र सगळी तारांगणे, अवघे ब्रह्मांड गणरायाच्या विशाल उदरात सामावली आहेत. म्हणजे हा महागणेश ब्रह्मांड विश्वव्यापक आहे कारण ज्या मूळ शक्तीपासून हा गणेश झाला आहे तो गणेश आणि ती शक्ती एकच आहे. त्यामुळेच गणेशाच्या उदरात ब्रह्मांड सामावून जाते. अणूरेणूत जे मूळ तत्त्व आहे तेच संपूर्ण आकाशात आहे. म्हणून अणोरणीया थोकडा तुका आकाशाएवढा ही मूळ तत्त्वाच्या एकरूपतेची अनुभूती ते सांगतात. ती समजून घेतली पाहिजे आणि गणेशाचे विश्वव्यापक रूपही समजून घेतले पाहिजे.
संग्रहीत चिंतन

ज्ञानोबा तुकाराम
जय मुक्ताईं